गड़हिंग्लज ते कोल्हापूर असा नॉन स्टॉप धडाडीचा प्रवास. धडाडीचा यासाठी की तब्बल पंच्याहत्तर मिनिटात वाटेतील खड्डे, स्पीड ब्रेकर ओलांडून, आम्हा शेवटच्या सीटवर बसलेल्या लोकांची हाडं वर खाली करून, मग हायवे ला जरा पाठीला शेक देऊन सुखरूप पोहचवले म्हणून. एक नेहमीचा प्रवास करणारा खिडकीला बसला होता. कुठे खड्डा, कुठे स्पीड ब्रेकर आहे हे अगदी तोंडपाठ होतं त्याला. तरीही काय व्हायची ती झाली कसरत आमची. बुकिंग न करता प्रवास करायची मुळात हौस त्यामुळेच तर असे अनुभव मिळतात.
मग कोल्हापुर ते पुणे बस ला नेहमीची गर्दी. बॅग ओढ़त एकटीला गाड्यांमागे धावून सीट मिळणार नाही कळून चुकले. ‘शिवशाही’ व इतर गाड्यांचं आधीच बुकिंग फुल्ल. मग काय अर्ध्या एक तासाने सुखरूप एका बस मध्ये चढू शकले. एक साठीच्या आसपास सभ्य गृहस्थ आले, त्यांनाही शेजारी जागा दिली. कंडक्टर ने त्यांना उठवलं कारण आम्ही कंडक्टरच्या सीटवर बसलो होतो. ते काही न बोलता हसत उतरून गेले दुसऱ्या बसच्या मागे. पण मला मात्र त्यांना बस कशी मिळेल याची काळजी वाटून राहिली. मग शेजारी एक दूसरा माणूस बसला, तोवर कंडक्टर चालकाच्या केबिन मध्ये बसणार हे ठरल होतं. असं वाटत होतं या शेजारी बसलेल्या माणसाला उठवून त्या आजोबांना शोधून आणावं. आणि झालं तसंच, गाड़ी कराड ला जात नाही म्हणत शेजारचा माणूस उतरून गेला, आणि मी मात्र जागा अडवून त्या आजोबांना शोधू लागले खिड़कीतून. सुदैवाने ते आजोबा दिसले आणि एकदाची माझी ईच्छा पूर्ण झाली आणि काळजी मिटली. असा मग आमचा म्हणजे माझा आणि शेजारी बसलेले आजोबा यांचा गप्पा-प्रवास, कोल्हापूर-पुणे प्रवास सुरु झाला.
आजोबांचा उत्साह दांडगा, चेहरा हसरा. हातात एक कापडी पिशवी अडकवलेली, पांढरी विजार, कुर्ता, करड्या रंगाचा बिनबाहीचा कोट आणि टोपी, पिशवीत वर्तमानपत्र, काही फळं वाटेत खायला, एक छोटी पाण्याची बाटली, खिशात एक पेन आणि चमचा असा सारा लवाजमा सोबत. आजोबांनी रीतसर जेष्ठ नागरिक पास दाखवून तिकिट घेतले. मग धडपडत पेपर वाचून काढला. तसा त्यांचा शब्दकोडे सोडवण्याचा विचार होता पण बसच्या धड़पडीमुळे त्यांनी तो सोडून दिला. मग त्यांनी डाळींब सोलुन खिशातल्या चमचाने खाल्ले (यावेळी मात्र आपण स्वतः नखं काळी पडतात म्हणून नेहमी ऐतं सोललेलं डाळींब खातो याची खरच लाज वाटली). मध्ये गाडी थांबल्यावर ते चुना-तंबाखू लावून आले आणि निवांत बसून डुलक्या मारू लागले. या सगळ्यात मध्ये मध्ये आमच्या थोड्या गप्पा झाल्या. तर, त्या दिवशी त्यांचा उपवास होता (चुना-तंबाखु उपवासाला चालतो का हा मला पडलेला प्रश्न त्यांना नाही विचारला मी). दर एकादशीला ते आळंदीला एकटे जातात. दरवर्षी वारी करतात तेही आळंदी ते पंढरपुर पायी. त्यादिवशी ते आळंदी करून, पुण्याचे प्रसिध्द कसबा व दगडूशेठ गणपती दर्शन घेऊन पुन्हा परतीच्या प्रवासाला लागणार होते.
घर, संसार, नोकरी असा नाशिक ते कोल्हापूर (सध्या कोल्हापूर स्थायिक) प्रवास व्हाया पुणे, हे त्यांचं थोडक्यात आयुष्य. पण या आयुष्याच्या प्रवासात एकदा म्हणजे तब्बल तीस वर्षापूर्वी ते आजोबा त्यांच्या ऐन तारुण्यात रेल्वे मध्ये चढताना पडले. रेल्वे पुढे निघुन गेली पण यांना प्रचंड यातना मागे ठेऊन गेली. त्यांचा उजवा हात कोपरापासून गेला, डाव्या हाताला फक्त अंगठा शिल्लक राहिला. अतिशय मोठा धक्का होता तो त्यांच्यासाठी आणि कुटुंबासाठी. परावलंबी झाल्याने आपण का मेलो नाही असे तेव्हा त्यांना सारखे वाटत राहायचे. पण त्यांचा काळ आला होता पण वेळ नाही आणि म्हणूनच त्यांचं जगणं हेच सर्वमान्य सत्य होतं. अतिशय वेदना, शारीरिक आणि मानसिक दुखणी यांनी त्यांचं धडाडीचं तारुण्य हिरावून घेतलं होतं. पण याच घटनेनं त्यांना जगण्याचं बळ दिलं कारण जगण्याचं दान तर त्यांना मिळालंच होतं.
आज प्रत्येक गोष्ट ते एकट्याने करतात आणि तेही सगळं स्वीक़ारून अगदी हसत मुखाने (याठिकाणी तिसरा परिच्छेद पुन्हा वाचला तर लक्षात येईल). कोल्हापूर स्टँडवर त्यांना पाहिल्यापासुन मला त्यांची काळजी वाटत होती ती त्यांच्या या अवस्थेमुळे. संपूर्ण हात नसताना, कोणी सोबत नसताना प्रवास करत होते ते. त्यांना पाहिल्यापासून त्यांच्याबद्दल आदर व कौतुक वाटत होतं मला आणि त्यांची जीवनकथा ऐकून त्यात आणखी भर पडली. जणू मला जीवनातल्या संकटांवर मात करण्यासाठी एक हिम्मत मिळाली.
त्या दिवशी एक गोष्ट लक्षात आली. आपण आयुष्यात कितीही काहीही कमावलं तरी ते कधी हातातून सुटून जाईल याचा काही नेम नाही. आणि समजा कितीही काहीही गमावलं तरी जिद्दीने पुन्हा सामोरे जाऊन जिंकू तर त्यासारखी दुसरी काही आयुष्याची कमाई नाही. खरंतर कठीन काळ छोटाच असतो, आपणच त्यात जास्त वेळ गुंतुन राहतो. प्रत्येक दिवस हसतमुखाने सामोरे जाऊन नकारात्मक गोष्टींची वजाबाकी करायला जमलं की छान जगायला जमलं म्हणून समजायचं. आणि समस्या तर येतच राहतात जगण्यात. प्रत्येक समस्येला उत्तर आणि मार्ग असतोच. फक्त विश्वास आणि प्रयत्न हाताशी असले की आपण हे जगणं नंदनवन नक्कीच बनवू शकतो, जसं त्या आजोबांनी संपूर्ण हात नसतानाही करून दाखवलं.
त्या दिवसाच्या प्रवासात मला माझ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं भेटली, आणि हे वाचनाऱ्यालाही नक्कीच भेटतील.
खरंच, प्रवासात जगणं शिकता येतं आणि कधीकधी आयुष्यही भेटून जातं.
You need to login in order to vote
Leave A Comment