आपल्या आयुष्यात आपण महत्वाची व्यक्ती गमावली तर आपल्याला जी हरवल्याची भावना होते तीच भावना आपण कुठेतरी हरल्याची भावनाहि देते. पण माझ्या घरच्या आणि आसपासच्या लोकांनी कधीच मला हरल्याची भावना जाणवू दिली नाही. आज हे सगळे विचार डोक्यात भून-भून करत नाहीयेत तर संथपणे फिरतायत. साधारण १ वर्षांनंतर आज पहिल्यांदाच चारचौघात बाहेर जाण्यासाठी मी तयार झालीये, लाल रंगाची साडी नेसलीये आणि म्याचिंग कानातलेही घातलेत.
आमच्या इमारतीत सोहम नावचं ३ वारशाच वादळ आहे आज त्याचा वाढदिवस. आईपण खूप खुश आहे. आज बर्याच दिवसांनी मी माणसात जाणार आणि पुन्हा माणूस होणार याची तिला आशा आहे. तिला असं वाटते कि वर-वर मी कितीही खुश असले, तरी आत कुठेतरी एकट असल्याची भावना मला दुखी करत असेल, पण खर तर आता मी दुखाःतून बाहेर आलीये, त्याशिवाय का अशा वाढदिवसासारख्या कार्यक्रामात चार लोकांमध्ये जातीये. खरतर दुखः कुरवाळत बसलो तर एके दिवशी ते दुखःहि कंटाळवाणे वाटू लागते आणि जर त्यातून बाहेर पडायला एखाद्या आनंदी गोष्टीची जोड मिळाली तर आपण इतके दिवस दुखी का होतो? या प्रश्नांने आपलं आपल्यालाच हसू येतं.
असो, तर अशी मी मस्त तयार होऊन नुकतीच घराबाहेर पाउल ठेवलं आणि हे काय समोरच्या मोहिते काकूही बाहेर आल्याच. मला बघून त्या इतकं छान हसल्या कि माझा मूड अजूनच फ्रेश झाला. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि आश्वासक धरून ठेऊन म्हणाल्या..
“किती सुंदर दिस्तीयेस ग मीरा, अगदी ताज्या ताज्या टोमाटो सारखी.”
मी, “इतकी जाडी?”
त्या खुद्कान हसून म्हणाल्या, “नाही ग वेडे इतकी तरतरीत.”
आम्ही दोघी एक-एक पायरी उतरत खालच्या मजल्यावर निघालो. पाहतो तर काय, इमारतीतल्या अनेक बायका, लहान मुले, आजी आजोब या सगळ्यांनी सोहमचे घर अगदी गच्च भरलंय. घरातून बाहेर निघताना मी थोडीशी बावरले होते, कोण कोण भेटेल, काय काय बोलेल, पण मी पोहोचताच सगळ्या बायकांचा माझ्या भोवती एकच घोळका झाला, आणि मग काय मस्त गप्पा सुरु झाल्या. आपण उगाचच लोकांबद्दल गैरसमज करून घेतो. मी रोजची यांच्यातलीच आहे असंच वाटतय मला.
इतक्यात सोहमच्या आईने सगळ्यांना केक कापण्यासाठी एकत्र होण्यासाठी सांगितलं, पण त्याआधी औक्षण झालं पाहिजे म्हणून ५ सुवासिंनिना पुढे यायला सांगितलं. सोहमच्या आईने मलाही पुढे बोलावलं.
पण इतक्यात नवीन भाडेकरू निर्मलाताई म्हणाल्या, “ती कशाला, अजून बायका आहेत ना….”
त्या एका वाक्याने माझे अवसान गाळले, ज्या उमेदिनी घरातून बाहेर निघाले होते ती सगळी उमेद कोलमडून पडली. माझं लग्न, राम बरोबरचा संसार, प्रेमळ सासू सासरे, अचानक राम ला आलेला हृदयाचा झटका, त्याचं कोमामध्ये जाणं, १० दिवस हॉस्पिटल च्या ICU बाहेर आशेच्या आधारावर जगणारी मी, अवघ्या ३ महिन्यांचा संसार हळू हळू संपत चाललाय याची स्वतःलाच वारंवार समजूत घालणारी मी, रामला शेवटच पाणी पाजणारी आणि तो गेल्यानंतर फक्त व्याकूळ आणि अस्वस्थ मी.
अशा सगळ्या आठवणी एखाद्या चित्रफितीप्रमाणे सरकन डोळ्यासमोरून गेल्या. पुन्हा एकदा आपण हरल्याची भावना दाटून आली. कशाला पडले मी घराबाहेर, समाज जे काही शुभ-अशुभ मानतो ते कधीच बदलत नाही, काही लोक दाखवतात तर काही नाही दाखवत इतकच, म्हणजे इथे आलेल्या प्रत्येकाच्या डोक्यात हेच आहे तर. मी यायलाच नको होत. शिशिरात झाडाची सगळी पाने गळून जावीत तसाच माझा धीर गळून गेला, तिथून उठून घरी चालत जावे इतकी ताकदही माझ्यात नाही असं मला वाटू लागलं.

Story
इतक्यात, खांद्यावरती एक उबदार स्पर्श झाला. सोहमची आई. त्या म्हणाल्या…”इतर बायका आहेतच पण मीरा खूप खास आहे. आम्ही आजपर्यंत तिच्यासारखी धीराची बाई पहिली नाही. अवघ्या ३ महिन्याच्या अर्धवट संसारच दुखः मनात ठेऊन मीराने पुन्हा आयुष्याची यशस्वी वाटचाल सुरु केली, तिने लिहिलेल्या २ नाटकांना प्रथम क्रमांकाची पारितोषिकेही मिळाली, दुखाला ताकद कशी बनवावी हे मिराकडून शिकावे. अशी मीरा जर औक्षण करून माझ्या सोहमला आशीर्वाद देणार असेल, तर मला खात्री आहे कि आमचा सोहमही काही अंशी तरी तिच्यासारखा धैर्यवान नक्की बनेल. त्यालाहि जर आयुष्यात अशा काही समस्येला तोंड द्यावे लागले तर तोही धीराने उभा राहील. ये मीरा औक्षण कर.”
गालावर ओघळणारे अश्रू कधी हसणाऱ्या ओठांपर्यंत पोहोचले कळालच नाही. इतक्यात …
निर्मलाताई म्हणाल्या, “पुढच्या आठवड्यात आमच्या जुईचा वाढदिवस आहे, मीरा तू नक्की यायचं हा…”
…………………………………………………………………………………………………………………………………
You need to login in order to vote
Leave A Comment